नवलकोलचे २ गड्डे
२ टेबलस्पून तेल
२ लाल सुक्या मिरच्या
१ टीस्पून पंचफोरण *
चवीप्रमाणे मीठ
थोडी कोथिंबीर
कृती -
नवलकोलाचे गड्डे धुवुन मधोमध आडवे कापावेत आणि खोबरे खवणतो तसे खवणून घ्यावेत. साल जाड असते ती टाकून द्यावी. तेल तापवुन त्यात पंचफोरण आणि लाल मिरचीचे तुकडे घालावेत. फोडणी तडतडली की त्यात नवलकोलाचा खीस घालुन परतावे. चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवुन भाजी शिजवावी. गॅस बारीक असावा म्हणजे करपत नाही, पाणी घालायची गरज पडत नाही. वरुन कोथिंबीर घालुन चपातीबरोबर खावी.
टीप -
१. नारळाची खवणी नसेल किंवा वापरायची नसेल तर साल काढणीने साल काढुन खिसणीने ते गड्डे खिसुन घ्यावेत.
२. * पंचफोरण म्हणजे मेथी, मोहरी, जिरे, कलौन्जी, बडीशेप प्रत्येकी १ टीस्पून घेउन एकत्र करावे आणि या मिश्रणातले १ टीस्पून वापरावे.
==============================================
कालोन्जी वाली मसूरडाळ
१ कप मसूर डाळ
१ टीस्पून कलौन्जी
१/४ टीस्पून हळद
२ सुक्या लाल मिरच्या
२ ओल्या लाल मिरच्या
२ लसुण पाकळ्या
१ टीस्पून तेल (ऑलिव,कनोला, सफोला कोणतेही चालेल)
१ टीस्पून मोहरीचे तेल (आवडत नसेल तर वर वापरलेलेच तेल वाढवावे)
चवीप्रमाणे मीठ
१/२ लिंबाचा रस (वगळायला हरकत नाही)
कृती - मसुरडाळ शिजवुन घ्यावी (कुकरला किंवा साधी गॅसवर). मिरच्यांचे प्रत्येकी २ तुकडे करुन घ्यवेत. लसुण ठेचुन किंवा बारिक चिरुन घ्यावा. शिजलेली डाळ पळीने किंचीत घोटावी पण खुप नको.तेल तापवुन त्यात हळद व कलौंजी घालुन अर्धा मिनीट तसेच राहु द्यावे. त्यात लाल मिरच्यांचे तुकडे, ठेचलेला लसुण घालावा. अजुन अर्धा-एक मिनीट परतून त्यात घोटलेली डाळ घालावी. गरजेप्रमाणे पाणी घालावे. डाळ खुप पातळ करु नये. मीठ घालुन एक उकळी आणावी. आवडत असेल तर लिंबाचा रस घालावा. भाताबरोबर गरम गरम वाढावी.
================================================