सोमवार, २५ जुलै, २०११

चायनाग्रास पुडिंग




साहित्य: 2 चमचे बारीक चिरलेले चायनग्रास, 3 कप दूध, 3 चमचे साखर, 50 ग्रॅम कस्टर्ड पावडर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, 1 सफरचंद, 3 केळी, 7-8 काजू, 3-4 अक्रोड व लाल रंगाचा 2 चमचा जॅम.

कृती : चायना ग्रास 2 तास पाण्यात भिजत घालावे. नंतर थोड्या गरम दुधात घालून विरघळवून घ्यावे. थोड्या दुधात कस्टर्ड पावडर घालून मिश्रण सारखे करावे. उरलेले दूध व साखर एकत्र करून गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की त्यात चायनाग्रासचे मिश्रण घालावे. मोठ्या चमच्याने मिश्रण ढवळावे. चांगले उकळले की त्यात कस्टर्ड पावडरचे दूध घालावे. व्हॅनिला इसेन्स घालावा. सतत ढवळत राहावे. मिश्रण घट्टसर झाले की उतरवावे. भांड्यात काढून फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करावे. जॅममध्ये 1 चमचा पाणी घालून गरम करावे. केळ्याचे काप करावे. पुडिंगच्या वर पसरावे. अक्रोडाची व काजूची जाडसर पूड करावे. प्रत्येकाच्या बाऊलमध्ये पुडिंग सर्व्ह करताना त्यावर अक्रोड काजूची पूड घालून द्यावे.

स्वीट खसखस कुकीज


साहित्य : 1 कप मैदा, 1 कप रवा, 1 कप खसखस, 1 कप लोणी, 1 लहान चमचा बेकिंग पावडर, 1 लहान चमचा साखर, आवश्यकतेनुसार दूध, रंग बेरंग्या गोळ्या किंवा शोपचे दाणे.

कृती : रवा व मैदा चाळून घ्यावा. त्यात खसखस वाटून त्यात मिसळावी. लोणी, साखर आणि बेकिंग पावडर त्यात टाकावी. दूध गरम करून या मिश्रणात घालून एकजीव करावे. काही वेळ ते मिश्रण झाकून ठेवावे. नंतर या मिश्रणाला एका आकारात लाटून त्याचे काप करावे. ट्रेमध्ये थोडं तूप लावून कुकीजला बेक करून घ्यावे. शोप किंवा रंग बेरंग्या गोळ्या घालून सर्व्ह करावे.

शाही ब्रेड स्टिक्स



साहित्य : ब्रेड स्लाइस अंदाजे, 3-4 बटाटे, 1/4 कप पालक चिरलेला, 1 गाजराचा कीस, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 1 चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 कांदा चिरलेला, 1 चमचा सोया सॉस, चिमूटभर अजीनोमोटो, काजूचे काप, 10-12 मनुका, 2 चमचे तेल, मैदा, मीठ आणि आवरणासाठी तेल.

कृती : ब्रेडला सोडून सर्व साहित्य एकजीव करावे आणि ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसवर लावावे. चाकूने स्लाइसला लांब कापावे. मैद्याचा घोळ तयार करून ब्रेडच्या त्या भागावर लावावे जिथे हे मिश्रण लावले आहे. कढईत तेल गरम करून तळून घ्यावे. गरम गरम चहा किंवा चटणी, सॉस सोबत सर्व्ह करावे.

सफरचंदाचा हलवा



साहित्य - ४ सफरचंदे, २०० ग्रॅम खवा, १५० ग्रॅम साखर, ३ चमचे तूप, ७-८ वेलची, २५ ग्रॅम बदाम, पिस्ते, चारोळी.

कृती - सफरचंदाची साले व बिया काढून घ्याव्या व स्टीलच्या किसणीने किसून घ्यावी. साखरेत थोडे पाणी घालून पाक करत ठेवावा. पाक दोन तारी झाला की त्यात किसलेले सफरचंद घालून मंद आचेवर ढवळत राहावे. मिश्रण घट्ट झाले की त्यात खवा घालून मंद आचेवर सारखे ढवळत राहावे. मिश्रण चांगले झाले की वेलचीची पूड, बदामाचे काप करुन घालावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की खाली उतरावे. खायला देताना पिस्त्याचे काप, चारोळी घालून द्यावे.

शनिवार, २३ जुलै, २०११

मैसूर पाक




साहित्य :

200 ग्रॅम बेसन, 200 ग्रॅम साखर, 350 ग्रॅम तूप. कृती : बेसन आणि चार मोठे चमचे तूप मिसळावे आणि त्याला चांगल्याप्रकारे परतावे. खाली काढून वेगळे ठेवावे. साखरेत एक कप पाणी टाकून पातळ चाशनी बनवावी. साखरेची चाशनी तयार झाल्यानंतर कमी आच करून थोडे भाजलेले बेसन मिसळून सारखे हालवावे. ह्याच प्रकारे सर्व बेसन संपेपर्यंत हिच प्रक्रिया करावी. नंतर मिश्रणाला हालवत थोडे-थोडे करून सर्व तूप टाकून द्यावे. आंचेवरून काढून तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकावे आणि त्याला समातलं करावे. मिश्रण थंडे झाल्यावर मनासारख्या आकारात कापावे. जास्तीचे तूप वेगळे करून घ्यावे.

गुळाच्या पोळ्या





साहित्य :
अर्धा किलो गुळ,
अर्धी वाटी खसखस,
अर्धी वाटी तीळ,
५-६ वेलदोड्यांची पूड,
१ चमचा खोबर्‍याचा किस,
अडीच चमचा डाळीचे पीठ,
२ वाट्या कणीक,
१ वाटी मैदा,
२ लहान चमचे तूप

कृती :
सर्वप्रथम कणिक, मैदा व अडीच टेबलस्पून डाळीचे पीठ एकत्र करुन त्यात जरा जास्त मोहन घालून पोळ्यांसाठी पीठ भिजवून ठेवा.
चांगला पिवळा गूळ किसून घ्या.
तीळ, खसखस व खोबर्‍याचा कीस भाजून घ्या व नंतर त्यास कुटून घ्या.
अडीच टेबलस्पून डाळीचे पीठ थोड्या तुपावर चांगले भाजून घ्या.
वेलदोड्यांची पूड घालून सर्व एकत्र मळून घ्या.
नंतर कणकेच्या दोन लाट्या जरा लाटून घ्या. त्यात गुळाच्या सारणाची मोठी गोळी घालून कडा दाबून, हलक्या हाताने पोळी लाटा. तव्यावर खमंग भाजा. त्या थोड्याशा कडकच होतात व खूप दिवस टिकतात.

तीळाच्या करंज्या




साहित्य : ३ वाट्या मैदा, १ वाटी तीळ, १ वाटी किसलेला गुळ, आर्धी वाटी खसखस, आर्धी वाटी परतलेला खवा
अर्धा टेबलस्पून तूप आणि १ पाव तूप घ्या.
कृती : सर्वप्रथम तीळ भाजून बारीक करुन घ्या. नंतर खसखसही भाजून घ्यावी. तीळ, किसलेला गुळ, खसखस,परतलेला खवा व तूप एकत्र करुन त्याचे सारण तयार करुन घ्या. मैद्यामध्ये मोहन घालून चांगले एकजीव करुन घ्या. चवीसाठी थोडे मीठ घालून दुधाने मैदा घट्ट भिजवून घ्या. दहा मिनिटे झाकून ठेवा. नंतर हव्या तेवढ्या आकाराच्या पुर्‍या लाटून त्यात करंजीप्रमाणे तिळाचे सारण भरा. तूपात ह्या करंज्या तळाव्यात.


अनघा हिरे
नासिक