साहित्य :
१ किलो कॉलीफ्लॉवर, ५०० ग्रॅम गाजरे, १०० ग्रॅम, आले, १०० ग्रॅम लाल सुक्या मिरच्या ( कमी तिखट असलेल्या), १ जुडी पुदिना, २५ ग्रॅम दालचिनि, २० ग्रॅम मिरी, २० ग्रॅम लंवगा ( थोड्या कमी चालतील), ५ कप व्हिनीगर, २५० ग्रॅम गूळ, २५० ग्रॅम तेल, २५० ग्रॅममीठ, ५० ग्रॅम लसूण
कृती :
कॉलीफ्लॉवर स्वच्छ करून बारीक चिरावा. पाने व मधला दांडोरा टाकून द्यावा. किंवा सूपमधे उपयोग करावा. गाजराच्या इंचभर लांबीच्या पातळ व बारीक कापट्या चिराव्या. धुतलेली भाजी पातळ फडक्यावर पसरून कोरडी होऊ द्यावी. पुदिन्याची पानेखुडावी. आले किसावे व लसूण सोलावी. लाल मिरच्यासह आले-लसूण-पुदिना थोडेसे व्हिनीगर घालून बारीक वाटावे. लवंगा, दालचिनी व मिरी यांची कुटून बारीक पूड करावी. गुळात उरलेले व्हिनीगर घालून जाड पाक करावा व बाजूला ठेवावा. भाज्यांचे तुकडे, वाटलेला मसाला, कुटलेली पूड व मीठ एकत्र मिसळावे. एका रुंद तोंडाच्या बरणीत भरावे. त्यावर गुळाचा गार झालेला पाक ओतावा व चांगले वळावे. चौपदरी दादरा बांधून ७-८ दिवस बरणी उन्हात ठेवावी. रोज सकाळी हलवावी. संध्याकाळी घरात आणून ठेवावी. आठवड्यानंतर लोणचे वापरण्यास हरकत नाही. मात्र बरणी कोरड्या जागी ठेवावी.
************************************************
कारल्याचे लोणचे
साहित्य :
४०० ग्रॅम कारली, ४-५ चमचे मीठ, अर्धी वाटी लोणच्याचा मसाला, २ लिंबे
कृती :
कारली सोलून त्याच्या पातळ चकत्या कराव्या, त्यांना दोन चमचे मीठ चोळून एका फडक्यात बांधून साधारण एक तास पोळपाटाखाली दाबून ठेवाव्यात. तासानंतर त्या फोडी एका तसराळ्यात घ्याव्यात. सुटलेले पाणी घेतले नाही तरी चालेल. त्यात लोणच्याचा मसाला, २ चमचे मीठ घालून कालवावे. लिंबाचा रस काढून त्यावर घालावा. दोन दिवसानंतर खायला घ्यावे. महिनाभर हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवल्यास टिकते.
*******************************************
आवळ्याचे लोणचे
साहित्या :
१ किलो मोठे आवळे, २५० ग्रॅम मीठ, २५० ग्रॅम तेल, १० ग्रॅम मोहरीची डाळ, १०० ग्रॅम लाल तिखट ( थोडे कमी चालेल), ४ चमचे ओवा, ४ चमचे जिरे, ५० ग्रॅम सैंधव
कृती :
आवळे जरा कोचवून दहा मिनिटे वाफवून घ्यावेत. जिऱ्याची कच्चीच पूड करावी. चमचाभर तेलात ओवा जरा परतून घ्यावा. मोहरीची डाळ बाजारात मिळते ती मोठी असते. थोडा वेळ उन्हात ठेवून जरा कुठावी. त्यात थोडे ( अर्धा वाटी) पाणी घालून फेसावी व त्याची गुळगुळीत पेस्ट करावी. या फेसलेल्या मोहरीत सर्व मसल्याच्या पुडी, तिखट व हळद घालावी. मीठ सैंधव मिसळावे. एका स्वच्छ बरणीत तळाला थोडे मीठ घालावे. त्यावर थोडे आवळे घालावे. त्यावर मसाल्याचा एक थर द्यावा. त्यावर पुन्हा आवळ्याचा थर व त्यात पुन्हा मसाल्याचा थर द्यावा. शेवटचा थर मसाल्याचा असू द्यावा. तेल कडकडीत तपवून गार करावे व या मिश्रणावर ओतावे ७-८ दिवस ती बरणी दिवसा उन्हात ठेवावी पंधरा दिवसानंतर वापरायला घेण्या जोग लोणचे तयार होईल.
***********************************************
मिरचीचे लोणचे
साहित्य :
१ किलो लांबट हिरवी मिरची, २ वाट्या मोहरीची डाळ, अर्धा चमचा मेथीची (कच्ची) पूड, दीड चमचा हळद, २ चमचे हिंग, २॥ ते ३ वाट्या मीठ, १२ लिंबे (रस), १ वाटी तेल
कृती :
एका मध्यम आकाराच्या परातीत किंवा ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. लहान पातलीत तेल कडकडीत तापवावे. धूर दिसेपर्यंत तापले की परातीतल्या जिनसांवर ओतावे व झाऱ्याने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा.
मिरच्या धुवून फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. त्यांचे आपल्या आवडीनुसार बेताचे तुकडे करावे. मिरची यंत्रात बारीक केली तरी बिघडत नाही. त्यात ४ चमचे वगळून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा. उन्हात ठेवलेल्या बरणीत तळाला २ चमचे मीठ घालावे. बरणी गार असावी. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून दोन चमचे मीठ घालावे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बारा लिंबचा रस काढून लोणच्यात घालावा.
लिंबाच्या साली फेकून देऊ नयेत. सालीचेही चवदार लोणचे बनवता येते.
************************************************
************************************************