भाताचे विविध प्रकार

फणसाची खिचडी

फणसाची खिचडी बनविण्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ, पिकायला आलेल्या कापा फणसाचे १०-१२ गरे बिया काढून, एक चहाचा चमचा तूप, एक चहाचा चमचा आलं-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, एक कांदा उभा चिरून, तेल अर्धी वाटी. तमालपत्र पाच-सहा तुकडे, एक चमचा साखर, अर्धी वाटी ओले खोबरे, किचन किंग मसाला चार चमचे असे साहित्य तयार असू द्या.

आता फणसाचे गरे बिया काढून उभे तुकडे करावेत. तांदूळ धुवून पाणी, निथळून, त्यात तूप घालून दूध पाणी घालून नेहमीप्रमाणे मोकळा भात शिजवून घ्यावा. पातेल्यात तेल घालून तमालपत्राचे तुकडे घालावेत. उभा चिरलेला कांदा घालून परतावे. त्यातच आलं, लसूण पेस्ट परतावी, एक चमचा साखर भुरभुरावी, परतून घ्यावे म्हणजे कांदा कडक होतो. गॅस बंद करावा.
------------------------------------------------------------------------------------------------


केशरी भात ( संत्री घालून)




साहित्य :
१ वाटी बासमती तांदूळ, २०० ग्रॅम साखर, १ मोठे किंवा २ लहान संत्री, ३ मोठे चमचे लोणकढे तूप, ४ दालचिनीचे लहान तुकडे, ४ लवंगा, ४ वेलदोडे, पाव चमचा केशर ( दुधात भिजवावे), १ मोठा चमचा संत्राच्या सालीचा कीस, ८-१० बदाम व काजूचे काप, १०-१२ बेदाणे, खास प्रसंगी चांदीचा वर्ख व चेरीज, ३-४ थेंब ऑरेंज रंग

कृती :
तांदूळ धुवून तासभर बाजूला ठेवावे. ४ कप आधण पाण्यात तांदूळ वैरावे व १२-१३ मिनिटे प्रखर आंचेवर अर्धवट शिजवावे. चाळणीवर निथळावे व त्यावर थोडे गार पाणी ओतावे. एका ताटात भात पसरून गार करत ठेवावा.
साखरेत एक वाटी पाणी घालून एकतारीपेक्षा जरा कमी असा सुधारसाइतपत पाक करावा. एका जाड बुडाच्या पातल्यात तूप तापले की त्यावर लवंगा, दालचिनी व वेलदोडे फोडणीस टाकून त्यावर गार झालेला भात, संत्र्याच्या सालीचा कीस व पाक घालावा. संत्र्याचा रस काढावा व ताजा रस भातात घालावा. रंगाचे थेंब व काजूबदाम, बेदाणे (निम्मे) घालावे झाकण ठेवावे. पाच मिनिटांनंतर वाफ आली की पातेल्यासारखी एक तवा ठेवावा. केशर शिंपडावे व मंद आंचेवर भात पुरता शिजवावा.
उरलेले काजूबेदाणे, वर्ख, चेरीज इत्यादी सजावट करून शोभिवंत भांड्यात भात ठेवावा.
--------------------------------------------------------------------------------------------


टोमॅटो भात




साहित्य :
२ वाट्या तांदूळ, २५० ग्रॅम टोमॅटो, २ चमचे तूप, ४ लवंगा, १ कांदा, १ वाटी ओले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, ४-५ लसूणपाकळ्या, १ इंच आले, २ दालचिनीचे लहान तुकडे, ८-१० काळी मिरी, १ लिंबू, २ चमचे मीठ ( किंवा जास्त), १ चमचा साखर

कृती :
तांदूळ धुवून तासभर निथळत ठेवावेत. टोमॅटो बारीक चिरून ४ वाट्या पाण्यात शिजवावेत. पुरणयंत्रावर पाण्यासकट गाळून घ्यावे. भाताच्या पातलेल्यात तूप तापले की त्यावर लवंगा, काळीमिरी, दालचिनी घालून कांदा परतावा. एकीकडे आले-लसूण वाटून घ्यावे. मिरच्या उभ्या चिराव्या. कांदा लालसर झाला की तांदूळ परतावेत व वाटलेली गोळी व मिरच्या घालावे. मीठ व साखर घालावी. गाळून घेतलेले टोमॅटोचे पाणी घालावे. मंद आंचेवर भात शिजवावा. वाढताना त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. जास्त आंबट आवडत असेल त्यांच्यासाठी लिंबाची फोड द्यावी.

--------------------------------------------------------------------------------------------
पुलाव |




साहित्य :
दीड वाटी तांदूळ, अर्धी वाटी पनीर, अर्धी वाटी प्रत्येकी-मटारदाणे, गाजराचे तुकडे व बीन्सचे तुकडे, १ मोठा कांदा, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा शहाजिरे, अर्धी वाटी ओले खोबरे, दीड चमचा साखर, चवीनुसार मीठ, तूप
वाटणाचा मसाला :
६ लसूण पाकळ्या, २ मोठे चमचे धने, २ चमचे खसखस, २ मोठे चमचे ओले खोबरे, १ मोठा चमचा जिरे, १ इंच आले, ३ सुक्या मिरच्या, ४ वेलदोडे

कृती :
तांदूळ व भाज्या वेगवेगळ्या शिजवून घ्याव्यात. अर्धी वाटी खोबऱ्यात दोन वाट्या पाणी घालून मिक्सरमध्ये घुसळावे व गाळून घ्यावे. मिरच्या व कांदा उभ्या चिरावा. एका मोठ्या पातेल्यात ३ चमचे तूप तापवावे. त्यात शहाजिरे, मिरच्याचे तुकडे, कुस्करलेला पनीर, भात, भाज्या व मीठ घालून जरा परतावे. नीट मिसळले की बाजूला ठेवावे. वाटणाचा मसाला बारीक वाटून ठेवावा. दुसऱ्या पातेल्यात तूप तापले की त्यावर कांदा सोनेरी रंगावर परतावा. त्यावर वाटलेला मसाला परतावा. त्यावर मीठ, साखर व नार्ळाचे गाळलेले दूध घालावे. मंद आंचेवर दहा मिनिटे उकडू द्यावे. त्यात भाताचे मिश्रण घालावे व नीट ढवळून गरमगरम भात कोणत्याही करीबरोबर वाढावा.
--------------------------------------------------------------------------------------------


anagha hiray
anagha.hiray@gmail.com